राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आजपासून सुरु होणार; आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड होणार

1 min read

मुंबई दि.७:- राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज शनिवारी सकाळपासून सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या शपथविधीला सकाळी ११ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात मंत्र्यांचा परिचय, नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. शिवाय राज्यपालांचे अभिभाषण ही याच अधिवेशनात होईल. हे विशेष अधिवेशन तिन दिवस चालणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार असून आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर आणि रविवारीही शपथविधी सुरू राहील. सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाने विधान परिषदेची बैठक सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.सोमवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. त्यानंतर नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. सोमवारी सायंकाळ चार वाजता राज्यपालांचे भाषण होईल. त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येईल. या विशेष अधिवेशनात भाजपा महायुतीटे आमदार जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

सर्व आमदारांचे स्वागत गुलाब देत करण्यात येणार आहे. विधान भवनात सीएम आणि दोन्ही डीसीएम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. शनिवार आणि रविवारी दोन दिवसांत आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिसर्‍या दिवशी सोमवारी विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडला जाईल. या पदासाठील अगोदर निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल. दरम्यान, विधान परिषदेची बैठक सोमवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम दोन्ही सभागृहातून घोषित केला जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे