दिलीप वळसे पाटील महाविद्यालयामध्ये महापरीनिर्वाण दिन साजरा

1 min read

निमगाव सावा दि.६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयांमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी येथील इंग्रजीचे प्राध्यापक संजय जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतातील या व्यक्तीमत्वाची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले.भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता, कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर, शांततेच्या मार्गाने जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.उच्चविद्याविभूषित असे बॅरिस्टर बाबासाहेब हे भारतातील पहिले अर्थतज्ञ. जीवनात संघर्ष करुन त्याकाळात देशविदेशातून अनेक विषयाच्या मिळवलेल्या पदव्या थक्क करणाऱ्या आहेत. त्यांना मोठमोठे मानसन्मानही प्राप्त झाले. एकाच वेळी त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते. समाजाविषयी असलेल्या आपुलकीमुळे शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी कायदे करताना या ज्ञानाचा उपयोग केला.नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच त्यांना वाचनाची आवड लागली. संत कबीर, महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकासासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे समाजात बिंबविले. बाबासाहेब हे सर्वच क्षेत्रासाठी दीपस्तंभ. भारतातील पहिले अर्थतज्ञ. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी कामगारांचे, शेतकऱ्यांचेही नेतृत्व केले. न्याय दिला. महिलांना हक्क मिळवून दिले.शिक्षण जे प्रज्ञा, शील, करुणा हे गुण अंगी बाणवायला शिकवते. चांगले वाईट याची जाण होते. शिक्षणाने मुलांची मने सुसंस्कृत. गुणवत्तामय व्हावीत. सामाजिक बांधिलकीची कर्तव्य समर्थपणे पार पडता यावी असे शिक्षण हवे असे म्हणायचे. ज्ञानतपस्वी बाबासाहेब रोज बारा तास विविध विषयावर वाचन करायचे. मनुष्य जन्मभर विद्यार्थीच आहे असे ते म्हणत. त्यांच्या स्वतःच्या वाचनालयात पन्नास हजार पुस्तके होती. स्मारके ही ग्रंथालये व्हावीत असे म्हणत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संरक्षणाची कवचकुंडले प्राप्त करुन देणारी राज्यघटना डॉ. बाबासाहेबांनी दिली. कायद्याने सर्वांना समसमान अधिकार प्राप्त झाले. या घटनेने प्रत्येकाला न्याय दिलाय हे बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. म्हणूनच ह्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब महामानव ठरले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे