लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार आणि २१०० रुपयेही आम्ही देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
1 min read
मुंबई दि.६:- महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असे अनेक राजकीय तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये दिले जाणार, असे आश्वासन महायुतीने निवडणुकीआधी दिले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आम्ही लाडकी बहीण योजना सुरुच ठेवणार आहोत.
तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही बजेटच्या वेळी तसा विचार करु. शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस योग्यप्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच ते आपल्याला करता येतं. त्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे गतिशील असं सरकार होतं. आज आमची जी जाहिरात होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही. त्याबाबत मला विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे काय त्यावर मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाने मागच्या अडीच वर्षात गती घेतली आहे.
ही गती आता तशीच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही. पायाभूत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहिल असं मी आपल्याला सांगू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना आम्हीच सुरुच ठेवणार आहोत.
तसंच २१०० रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करु. आपले जे आर्थिक स्रोत चॅनलाईझ्ड झाल्यानंतरच हे करणं शक्य आहे.जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करु त्याकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहोत.
स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल. शेतकरी सन्मान योजना जेव्हा पंतप्रधान मोदींनी सुरु केली तेव्हा पहिल्या टप्प्यात असं कळलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनाही ते मिळालं आहे.
त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरही भाष्य केलं. “महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातील जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
मी शपथविधीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अशा सर्व लोकांना मी प्रत्यक्ष फोन करुन त्यांना निमंत्रण दिलं.
त्यातील प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तीगत कारणाने ते येऊ शकले नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.