निवडणूक कर्तव्यात कामचुकारपणा करणाऱ्या ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

सांगोला : महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ निवडणुकीच्या कामामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या ९ शिक्षकांनी खुलासा दिला नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुडुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माढाचे नायब तहसीलदार विजयकुमार कवडे यांनी शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४५ माढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कामकाजासाठी ११६८ पुरुष तर ४६८ महिला असे एकूण १६२६ कर्मचाऱ्यांचे दि. ८ ते ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण ठेवले होते. त्यानुसार तिसऱ्या प्रशिक्षणादिवशी ४० कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान गैरहजर असल्याचे आढळले. त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
मात्र गैरहजर राहिल्याने व साहित्य वाटपादिवशी हजर राहून स्वाक्षरी करून मोबाईल बंद करून निघून गेलेल्या माळशिरस व सांगोला तालुक्यातील ९ शिक्षकांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीवर तोंडी अथवा लेखी खुलासा न केल्याने कुडुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माढा तथा तहसीलदार माढा यांचे प्राधिकृत अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार विजय मधुकर कवडे (वय ५५) यांच्या फिर्यादीवरून सुरेश भोसले, किसन पवार, पांडुरंग पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, पी.डी. शेळके, माणिक राऊत,
राहुल ढालपे हे सात जण दि. १९ व २० रोजी आयोजित प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने व संभाजी शिंदे, नंदलाल वाघमारे हे दोघेजण साहित्य वाटपादिवशी हजर राहून स्वाक्षरी करून मोबाईल बंद करून निघून गेले असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
त्यामुळे या नऊ लोकसेवकांविरूध्द भारतीय न्याय संहिता २०२२ चे कलम २२३ सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ कलम १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक घोगरे हे करीत आहेत.