राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी; ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला आयडी देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

1 min read

पुणे दि.२८:- केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ३० नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील ६५ लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच अपार आयडी द्यावेत, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत.गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करत आहेत. केंद्र शासनाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.केंद्र शासनाने दिलेले निर्देश विचारात घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने २९ व ३० नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा,अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आला आहेत. या दोन दिवशी अपार आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात यावी. जिल्हास्तरावरून अपार आयडीबाबत ऑनलाइन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना द्याव्यात. या दोन दिवशी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचेअपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत विशेष प्रयत्न करावेत, अशाही सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिल्या आहेत.सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अपार आय डी, यु-डायस व आधार व्हेलिडेशनचे कामकाज तात्काळ पूर्ण करावे. अनेकदा सूचना दिलेल्या आहेत. मात्र, फार प्रगती दिसून येत नाही. पुढील दोन दिवसांत मुख्याध्यापकांनी व्यक्तिशः लक्ष घालून याबाबत कार्यवाही करावी. ज्या शाळा प्रतिसाद देणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुण्यातील शिक्षणाधिकारी यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे