बँक घोटाळा प्रकरणी रामकृष्ण बांगर यांना अटक

बीड दि.२८ – जिल्ह्याच्या पाटोदा येथील महात्मा फुले बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान बांगर यांना ही अटक करण्यात आली. रामकृष्ण बांगर यांनी शैक्षणिक संस्था, दूध डेअरी, महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील आपली छाप उमटवली होती. मात्र, राजकीय हितसंबंधाचा वापर करून सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.
बीड जिल्ह्यात महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गुन्हा त्यांच्यासह ४१ जणांवर दाखल आहे. गेल्या ३० ते ४० वर्षापासून अनभिषिक्त सम्राट बनलेल्या रामकृष्ण बांगर यांचे कुटुंब फरार झाले होते.
रामकृष्ण बांगर यांच्यावर आधीच गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना तुळजापूर येथे देवीचे दर्शन घेऊन घरी आलेल्या असताना ८ ऑक्टोबर रोजी घरातून अटक केली होती. दरम्यान या प्रकरणी पाटोदा पोलीस अधिक तपास करीत आहेत.