महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी ८ दिवस महाराष्ट्रात
1 min readमुंबई दि.२५:- विधानसभा -महाराष्ट्रातील निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून गुरुवारी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी शक्तीप्रदर्शन करत आपले नामांकन दाखल केले.
२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी भरण्याची तारीख असून त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या राज्यात ८ सभा होणार आहेत.मोदी ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर महाराष्ट्रात तळ ठोकून असणार आहेत. या ८ दिवसांत ते विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतील. पंतप्रधान १४ नोव्हेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी फारसा वेळ नसणार. त्यामुळे या ८ दिवसांत मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर महायुती भर देईल. मोदी केवळ भाजपच नाही तर महायुतीच्या घटक पक्षातील उमेदावारांच्या प्रचारासाठी सुद्धा सभा घेतील.विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दोघांकडूनही मोर्चेबांधणी करण्यात येत असून स्टार प्रचारकांच्या सभांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदार होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.