जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्यासाठी कुरण येथील आमरण उपोषणास सत्यशील शेरकर यांचा पाठिंबा

1 min read

कुरण दि.१५:- जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्यासाठी व इतर बिबट विषयक समस्यांसाठी शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे व त्यांचे सहकारी हे कुरण गावामध्ये आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट दिली व त्यांच्या मागणीला पाठींबा दिला.शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. नुकत्याच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी जुन्नर तालुका बिबट आपत्ती क्षेत्र घोषित केला असून बिबट समस्या निवारणासाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. हा निधी बिबट पकडण्यासाठीची यंत्रणा तसेच इतर तांत्रिक गोष्टींमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रशासनासोबत सकारात्मक बैठक झाल्यामुळे व काही महत्वाचे निर्णय यामध्ये घेण्यात आल्याने शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यांनी देखील विनंतीला मान देऊन उपोषण सोडले.शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा हा विषय वेळोवेळी शासन दरबारी मांडला आहे. ते बिबट प्रजनन नियंत्रण धोरण लागू करण्यासाठी निरंतर पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या साथीने आम्ही सर्वजण हा पाठपुरावा आणखी जोमाने करण्यासाठी कटीबद्ध आहोत.असा विश्वास मायबाप जनतेस देतो. असे शेरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.प्रसंगी पोलीस अधिकारी, कुरण ग्रामस्थ, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे