आळे रेडा समाधी मंदिरासाठी ५ कोटींचा निधी:- सुनील जाधव

1 min read

आळे दि.१५:- श्री क्षेत्र आळे (ता. जुन्नर) येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी व भक्तनिवास बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आळे येथील रेडा समाधी मंदिर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. या वेळी सचिव सुनील जाधव म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जातून भक्तनिवास, कीर्तन मंडप यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या आशा बुचके, माजी आमदार शरद सोनवणे यांचे सहकार्य मिळाले.विश्वस्त प्रसन्न डोके म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून रेडा समाधीस्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी व माजी आमदार शरद सोनवणे यांचे सहकार्यातून हा निधी उपलब्ध झाला.रेडा समाधी मंदिरच्या पाच कोटी रुपयांचे वीणा मंडपाचे काम सध्या लोकवर्गणी व देणग्यांतून सुरू आहे. या कामी आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या निधीतून ५० लाख, तर आशा बुचके यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३५ लाख व विरंगुळा भवनसाठी ४० लाख रुपये निधी दिला असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. उपाध्यक्ष अमोल भुजबळ, विश्वस्त जीवन शिंदे, गणेश शेळके, म्हतुजी सहाणे, बाळशिरम पिंगळे, दिनकर राहिंज, संदीप पाडेकर, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ व उमेश शिंदे उपस्थित होते. जीवन शिंदे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे