वडज धरणावरील जलसमाधी आंदोलन तात्पुरते मागे

1 min read

सावरगाव दि.१३:- विजयादशमीच्या दिवशीच वडज धरणावर जलसमाधी घेण्यासाठी मीना खोऱ्यातील शेकडो शेतकरी वर्ग व विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . मागील पस्तीस वर्षापासून वडज उजवा उपसा सिंचन योजना प्रशासकिय उदासीनतेमुळे प्रलंबित आहे. जुन्नर तालुक्यात पाच धरण आहे. त्यापैकी वडज धरणाच्या उजव्या बाजूतील अनेक वाड्या वस्त्या व गावांसाठी पिण्यास व शेतीस मुबलक प्रमाणात पाणी नाही. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. खिलारवाडी , निमदरी व सावरगावाच्या पाच वाड्यातील शेतकरी वर्ग या पाणी प्रश्नांविषयी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. प्रथमता वडज उजवा कालवा उपसा सिंचन योजनेची निविदा काढा या मागणीसाठी वडज धरणावर सकाळी ९ वा आंदोलनकर्ते पोहचले होते. कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून जुन्नर पोलिस स्टेशनने दोन दिवसापूर्वीच संबधित आंदोलकांना नोटीस दिली होती. त्यासाठी या आंदोलन स्थळी आज सकाळी आठ वाजता जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किरण अवचर, सहा पोलिस निरीक्षक संदिप मोरे व पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विनोद ध्रुवे व तीस पस्तीस पोलिस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी उपस्थित होते. सकाळी नऊ वा जलसमाधी आंदोलनास सुरुवात झाली. यामध्ये मीना खोऱ्यातील अनेक गावांतील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आंदोलनात सक्रिय सहभागीत होत पाठींबा दिला. प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाई व बेजबाबदार कारभारावर शेतकरी वर्गाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अखेर कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी आंदोलनकर्त्याशी प्रत्यक्ष संवाद साधत हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी पुढाकार घेत मंगळवार दि १५ ऑक्टो २०२४ रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ. अ कपोले यांच्याशी संबधित शेतकरी वर्गाच्या प्रतिनिधीची मिटिंग सिंचन भवन पुणे येथे आयोजित केली आहे. लवकरच तोडगा काढून हा मीनाखोर्‍यातील पाणी प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. अखेर जुन्नर पोलिस स्टेशनचे अधिकारी वर्ग व जलसंपदा विभागाचे उप अभियंता रितेश अदलिंगे, महेश शिंदे, सुरज कुदळे यांनी आंदोलकांची मनधरणी करीत हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी मिना खोऱ्यातील असंख्य शेतकरीजय शिवराय शेतकरी संघटना अध्यक्ष डॉ गणपत डुंबरे ,रमेश शिंदे, मनसे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पुणे योगेश तोडकर, आघाडी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन थोरवे मनसे तालुकाध्यक्ष तान्हाजी तांबे, सुरेश शेणकर, प्रशांत पाबळे, ॲॅड स्वाती पाबळे, ज्ञानेश्वर काचळे, दिलिप खिलारी, रामदास नायकोडी, अनिल मनसुख, महादेव बाळसराफ, तान्हाजी जुंदरे, साईनाथ ढमढेरे व दिपक बाळसराफ, राजेश खांडगे, जयेश खांडगे, लक्ष्मण वाणी तसेच असंख्य शेतकरी वर्ग या आंदोलनात सहभागी होते. मीना खोऱ्यातील या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी वडज उजवा कालवा उपसा सिंचन या योजनेसाठी शासनाने ३५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करीत प्रकल्पाला मान्यता दिली.या योजनेच्या माध्यमातून सावरगाव, खिलारवाडी, निमदरी, धोंडकरवाडी, तुकारामवाडी , एकनाथवाडी, काचळवाडी, पाबळवाडी, निळोबारायनगर यांसह इतर वाड्या वस्त्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी १९९० पासून शेतकरी व विविध शेतकरी संघटना आंदोलन करीत आहे. मागील वर्षी ३० जुलै २०२३ ला मोठ्या संख्येने महिला, तरुण वर्ग व शेतकरी बांधव अगदी भर पावसात उपोषणासाठी जुन्नर तहसील कचेरी समोर बसले होते. त्यानंतर १५ ऑगस्टला जलसमाधी घेण्यापर्यंत विषय गेला. मात्र वर्षा मागून वर्ष गेली तरीही आमच्या नशिबी फक्त घोषणाचा पाऊस येत आहे प्रत्यक्षात काहीच झाले नाही. तरी वडज उपसा सिंचन योजनेची प्रत्यक्ष निविदा काढून आचारसंहिता लागण्यापूर्वी योजना चालू व्हावी अशी शेतकरी संघटनेची व मीना खोरे संघर्ष समितीची आग्रही मागणी आहे.

प्रतिक्रिया १

“तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमचे फोन उचलत नाही. आता बस्स झालं शासनाने निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी हा प्रश्न सोडवावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणूकीवर आम्ही बहिष्कार घालून आम्ही योग्य ते उत्तर देऊ ‘तसेच गाईंना घेऊन मार्च महिन्यात काम न झाल्यास विधानसभा मोर्चा काढण्यात येईल”

प्रमोद खांडगे
अध्यक्ष पुणे, अखिल भारतीय शेतकरी संघटना

प्रतिक्रिया २

“वडज उजवा कालवा उपसा योजनेच्या कामास शासनाने तत्वता मंजुरी दिली असून हा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे . सदर योजना लवकरच मार्गी लागणार असून मंगळवार दि १५ ऑक्टो रोजी सिंचन भवन पुणे येथे तात्काळ मिटिंग आयोजित केले आहे. शेतकरी बांधवानी जलसमाधी आंदोलन तात्पुरते मागे घेतल्याने सर्वांचे आभारी आहे.”

-राजेंद्र धोडपकर
कार्यकारी अभियंता
डिंभे धरण विभाग , मंचर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे