हाजी गुलामनबी शेख यांची जुन्नर येथील मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदावर नियुक्ती ची घोषणा
1 min read
राजुरी दि.४:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचा जुन्नर तालुका अल्पसंख्यांक मेळावा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष जावेद हबीब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक आणि सामाजिक प्रगतीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जावेद हबीब (नागपूर), प्रदेश उपाध्यक्ष साबीर अली सय्यद (अहमदनगर), पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, जुन्नर तालुका युवा अध्यक्ष सूरज वाजगे, जुन्नर शहर अध्यक्ष रौफ खान, माजी जिल्हा उपाध्यक्ष अकबर भाई पठाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात हाजी गुलामनबी शेख यांच्या नेतृत्वाला विशेष महत्त्व देण्यात आले. दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते, खासदार अमोल कोल्हे, निलेश लंके, युवा अध्यक्ष मेहबूब शेख आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हाजी गुलामनबी शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शरद पवार साहेबांच्या प्रेरणेतून शासकीय नोकरीचा त्याग करून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संकल्प आणि उम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे.जुन्नर येथील या अल्पसंख्यांक मेळाव्यात, जयंत पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांनी हाजी गुलामनबी शेख यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाच्या महासचिव पदावर नियुक्ती जाहीर केली.
आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या घोषणेमुळे कार्यक्रमात विशेष उत्साह संचारला. मेळाव्याचे सूत्रसंचालन अकबर भाई पठाण यांनी केले तर प्रास्ताविक सईद पटेल यांनी सादर केले. मेळाव्याचे मुख्य संयोजक हाजी गुलामनबी शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.