मोबाईल गेमींगपेक्षा मैदानी खेळच राखतील विद्यार्थ्यांचे आरोग्य; राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक एच.पी. नरसुडे यांचे प्रतिपादन

1 min read

बेल्हे दि.२९:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध, वक्तत्व या पारंपारिक स्पर्धांबरोबरच पाककला व पदार्थ सजावट, पुष्पगुच्छ व पुष्पाहार स्पर्धा, भेट कार्ड बनवा स्पर्धा यां सारख्या अनोख्या स्पर्धांचाही समावेश होता, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजित अभंग यांनी दिली. या वेळी राष्ट्रीय क्रीडा प्रशीक्षक प्रा. एच.पी. नरसुडे यांचे ‘शालेय जीवनात खेळांचे महत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. शाळा समिती सदस्य पांडुरंग गाडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पत्रकार सुधाकर सैद स्पर्धांचे उद्घाटक म्हणून विद्यालयात उपस्थित होते.

प्रा. एच.पी. नरसुडे आपल्या व्याख्यानात म्हणाले, “साध्या साध्या हालचालींनी आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकतो. सायकलिंग करणे, पोहणे, धावणे हे व्यायाम शालेय विद्यार्थ्यांना वरदान ठरू शकतात. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवणे हा ही एक प्रकारचा व्यायामच आहे. फक्त तो योग्य पद्धतीने करायला हवा” मुलांनी मोबाईलपासून कटाक्षाने दूर राहून मोबाईल गेमींगपेक्षा मैदानी खेळ खेळावेत असे आवाहन त्यांनी केले. व्याख्यानानंतर मान्यवरांनी शालेय स्पर्धांच्या विविध दालनांचे उद्घाटन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनवले होते. चमचमीत पदार्थांबरोबरच पौष्टिक पदार्थांच्या डिशेसही विद्यार्थ्यानी फळभाज्यांच्या नैसर्गिक रंगांनी सजवल्या होत्या. परिसरातील फुलांचा वापर करुन विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने सुबक पुष्पगुच्छ व पुष्पाहार बनवले होते. पुष्पगुच्छांसाठी विद्यार्थ्यांनी प्लँस्टिकसारख्या अविघटनशील पदार्थांचा वापर टाळून टाकाऊ पासून टिकाऊ तत्वाचा अवलंब केला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकुसरीने सामाजिक संदेश देणारी व वर्तमान घटनांवर भाष्य करणारी आकर्षक भेटकार्ड बनवली होती. निबंध व वक्तत्व स्पर्धेसही विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.निबंध स्पर्धांचे संयोजन विठ्ठल पांडे, वक्तत्व स्पर्धांचे संयोजन बाळासाहेब गावडे व प्रा. सुरेखा आहेर, पाककला स्पर्धांचे संयोजन प्रा. वर्षा घोलप व ऋतुजा कहांडळ, पुष्पगुच्छ स्पर्धांचे संयोजन चंद्रकांत हगवणे तर भेटकार्ड स्पर्धेचे संयोजन विजय कोल्हे यांनी केले. स्मिता बांगर व विकास गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. शालेय स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मुळूक यांनी तर आभार प्रदर्शन अनिवासी गुरुकुल विभाग प्रमुख सुभाष बांगर यांंनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे