समर्थ संकुलात शिवकालीन मर्दानी साहसी खेळ व लुप्त होत जाणाऱ्या कलाविष्कारांचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.२७:- जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ गुरुकुल, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यटन मंत्रालय यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या युवा पर्यटन क्लबच्या माध्यमातून जागतिक पर्यटन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील पर्यटन हे गडकिल्ल्यांभोवती केंद्रित झालेले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले दुर्ग वैभव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाराष्ट्रामध्ये येत असतात. शिवकालीन साहसी खेळ व लुप्त होत जाणाऱ्या कलाविष्कार यांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन युवा पर्यटन क्लब मधील सदस्यांसाठी करण्यात आले होते.
यावेळी छत्रपतींचे सेवक मर्दानी आखाडा, जुन्नर यांच्या वतीने मार्गदर्शक आकाश फुलपगार तसेच रिया फुलपगार, तन्वी रोकडे, शौर्य काकडे, आरुष रोकडे यांनी साहसी खेळाची उत्तम प्रात्यक्षिके केली. यामध्ये तलवारबाजी, निशानेबाजी, दांडपट्टा चालवणे, भालाफेक करणे.
त्याचबरोबर लाठीकाठीचे साहसी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली. लाठीकाठी चालविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच राष्ट्रीय नेमबाज रायफल शूटिंग विजेती इशिता काकडे हिने रायफल शूटिंगचे उत्कृष्ट प्रदर्शन दाखविले.
शिवकालीन शस्त्रास्त्रांमध्ये तलवार, दांडपट्टा, भाला इत्यादी प्रमुख शस्त्रांचा समावेश होता. लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा यांच्या चित्त थरारक व नयन मनोहर प्रात्यक्षिकांनी सर्वांना अत्यंत प्रभावित केले व त्यांच्या नजरेची पारणे फिटली.
त्याचबरोबर पर्यटन व शांतता या विषयाशी संबंधित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे ही पर्यटन क्लबच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. यावर्षी जागतिक वारसा नोंदीसाठी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, राजगड व लोहगड या किल्ल्यांची निवड करण्यात आलेली असून त्या दृष्टीने जनजागृती व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अशी माहिती युवा पर्यटन क्लबचे समन्वयक प्रा.भूषण दिघे यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य प्रा.सतीश कुऱ्हे,
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे, प्रा.दिनेश जाधव, प्रा.अश्विनी खटिंग, प्रा.सखाराम मातेले यांनी उपस्थित राहून जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.