श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात पार पडले मुलींचे हिमोग्लोबीन व रक्त तपासणी शिबीर
1 min read
बेल्हे दि.२६:-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. अनंतराव कणसे होमिओपँथिक मेडिकल कॉलेज व आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक सुमित बोरचटे यांच्या विशेष सौजन्याने श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थीनींची हिमोग्लोबीन व रक्तगट तपासणी करण्यात आली, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजीत अभंग यांनी दिली.
जागतिक किर्तीचे सर्पदंश व विषबाधा तज्ञ व विघ्नहर मेडिकल फौंडेशनचे संचालक डॉ. सदानंद राऊत यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. सदानंद राऊत यांंनी विषारी सापांच्या सर्पदंशापासून स्वतःचा बचाव कसा करावा व सर्पदंश झाल्यास करावयाच्या तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयी विद्यार्थ्यांंना उद्बोधित केले. या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते, अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ. साहिल शेख, डॉ.कोमल महाजन, डॉ. गीतांजली अभंग, डॉ.कांचन पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश चोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य विभाग प्रमुख कोमल कोल्हे व शैलेश गवळी यांनी आरोग्य शिबीराचे संयोजन पाहिले. स्मिता बांगर यांनी सूत्रसंचालन केले तर विजय कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले.