श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरात ग्रंथ दिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
1 min readबेल्हे दि.२५:- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभाग, पंचायत समिती, जुन्नर व श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालय, बेल्हे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ दिंडी आयोजीत करण्यात आली होती, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक अजीत अभंग यांनी दिली.शिक्षण विभाग, पंचायत समिती, जुन्नरच्या केंद्रप्रमुख सर्वश्री काळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी भारतीय शिक्षण संस्था, पुणे चे प्रमुख विश्वस्त डॉ. पांडुरंग गायकवाड यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बेल्हे गावचे उपसरपंच राजेंद्र पिंगट, केंद्रप्रमुख रत्नप्रभा वाघचौरे, शौकत पटेल, पांडुरंग भौरले तसेच विषय तज्ञ सीमा मोरे, संगिता भुजबळ आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शुभारंभी मान्यवरांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व कै. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महावाचन उत्सव उपक्रमातील सहभागी विद्यार्थिनी संस्कृती गुंजाळ व किमया आरोटे यांनी पुस्तक वाचन सादरीकरण केले. डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ‘व्यक्तिमत्व जडणघडणीत वाचनाची भूमिका’ या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सर्वश्री काळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला.
मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले. या नंतर ग्रंथ दिंडीचे नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान झाले. संत व समाजसुधारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शालेय मैदानात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कथा, काव्य, नाट्य, बालसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विज्ञानविषयक साहित्य इत्यादि विषयांवरील पुस्तकांची मांडणी ग्रंथ प्रदर्शनात करण्यात आली होती. परिसरातील प्राथमिक शाळांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. लहान मुले ग्रंथ पाहण्यात हरखून गेली होती.
ग्रंथपाल दिलीप आहेर यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे संयोजन पाहिले. विठ्ठल पांडे व अश्विनी गेंगजे यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.