जुन्नर तालुक्यातील तेजेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
1 min read
जुन्नर दि.२५:- जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून तेजेवाडी येथे आज बुधवार दि.२५ पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रुपेश तान्हाजी जाधव असे हल्ल्यात मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.
रूपेशचे आजी- आजोबा तेजेवाडी येथील राजू शिंदे यांच्या विटभट्टीवर काम करत असून तो आठ दिवसांपूर्वी म्हैसगाव (ता. राहुरी जि.अहमदनगर) येथून सुट्टी साठी आला होता.
पहाटे ५ वाजता तो प्रातः विधीसाठी गेला असता जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेले.
रूपेशला सोडविण्यासाठी कुटुंबातील आणि आजूबाजू च्या व्यक्तींनी आरडा ओरडा केला परंतू बिबट्याच्या तावडीतून त्याची सुटका झाली नाही .
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी प्रदिप चव्हाण आपल्या टिम सह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक रेस्क्यूटीम आणि वनविभागाच्या टिमने मुलाचा कसून शोध घेतला. त्या दरम्यान नरभक्षक बिबट्याही त्यांना आढळून आला. सकाळी ७:३० वाजता मुलाचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला.