बेल्ह्यात तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जोरदार स्वागत
1 min readबेल्हे दि.२४- गेल्या शेकडो वर्षाची परंपरा व अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन सोमवारी (दि.२३) मोठ्या उत्साहात व जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत बेल्हे बाह्यवळण रस्त्यापासून ते एसटी बसस्थानकापर्यंत पारंपारिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
गेल्या काही वर्षापासून स्वर्गीय देवराम शिंदे हे या पलंगाचे स्वागत करून चहापाण्याची व्यवस्था स्वतः करत होते. त्यानंतर माऊली रिक्षा चालक-मालक संघटना, एसटी बसस्थानक व्यापारी संघटना व बेल्हे ग्रामस्थ यांनी मिळून हा पलंगोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार पलंगाचे आगमन झाल्यानंतर संतोष गुळवे यांनी देवीची गाणी म्हणून देवीचे स्वागत केले व त्यानंतर महाआरती करण्यात आली. माऊली रिक्षा चालक-मालक संघटना व व्यापारी संघटना यांच्याकडून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले व चहापाण्याची व्यवस्था स्वर्गीय देवराम शिंदे यांच्या कुटूंबियांकडून करण्यात आली. त्यानंतर पलंग बेल्हे गावातील मुख्य पेठेतील नारायण आरोटे यांच्या घरासमोरील फुलांच्या रांगोळीवर विसावला व येथेही महाआरती होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी शहरातील सर्व पुरूष व जास्त करून महिलांनी देवीच्या पलंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.या सर्व पलंगोत्सव सोहळ्याचे नियोजन शिवसेना वाहतूक सेनेचे गोविंद बांगर,रमेश पिंगट,सागर हिरवे, विजय सोनवणे,स्वप्निल हिरवे,संतोष शिंदे,सूर्यकांत बांगर, मच्छिंद्र लामखडे, फिरोज शेख व व्यापारी संघटना यांनी केले त्या नंतर पलंगाचे कळस रस्त्यावरील अंबिका माता मंदिराकडे प्रस्थान झाले.