जुन्नर तालुक्यातील १३ हजार हेक्टर वरील सोयाबीन पिक धोक्यात; उत्पादनात होणार मोठी घट

1 min read

जुन्नर दि.२२:- गेली महिनाभरापासून पाऊस नसल्याने शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असणारे सोयाबीन, वाटाणा, तुर पीक करपू लागले असल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार आहे.जुन्नर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागले आहे. यावर्षी सोयाबीन पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. बेल्हे, राजुरी, आळेफाटा, आणे पठार, वडगाव कांदळी, कांदळी, नगदवाडी, येडगाव, साळवाडी, खोडद, शिरोली,निमगाव सावा, साकोरी, मंगरूळ, पारगाव व तालुक्याचा पश्चिम भाग या परिसरात १३ हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने व पावसाने ओढ दिल्याने हे सोयाबीन करपू लागले आहे तर काही भागात करपले आहे. चार – सहा दिवसात पाऊस झाला नाही तर सोयाबीन पूर्णपणे करपून जाणार आहे पाऊस झाला तरीही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असल्याने. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सोयाबीन पीक जोमदार होते. पाऊसही भरपूर झाला होता. विहिरीमध्ये पाणी आहे परंतु शेतीला फक्त आठ तास वीज असल्याने संपूर्ण क्षेत्राचे ओलीत होऊ शकणार नाही मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन पीक घेतले जाते गेली. महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाऊस नसल्यामुळे वातावरणामध्ये उष्णता व उन्हाचा तडाखा वाढला असून त्याचा परिणाम पिकाला होत आहे.

पिकविमा मिळण्याची मागणी:-सोयाबीन पिकाचा पीक विमा मोठा प्रमाणात शेतकऱ्यांनी काढला असून या पीकविम्याच्या हप्त्याचा मोठा भार राज्य शासनाने उचलला आहे. पाऊस वेळेवर न झाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.

त्यांना सरसकट पिक विमा मिळण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे शासनाने पिक विमा कंपनीला संपूर्ण सोयाबीन साठी पिकविमा मंजूर करण्याचे आदेश काढण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

हमीभावापेक्षा कमी भाव:-सोयाबीन पिकासाठी हमीभाव हा गेल्यावर्षी ४ हजार ६०० तर चालू वर्षी ४ हजार ८९२ रुपये केंद्र सरकारने घोषित केला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र सोयाबीनची खरेदी ही ४ हजार २०० ते ४ हजार ५०० या दराने होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

शासनाने हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री होणार नाही याची काळजी घेऊन हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सोयाबीनच्या उत्पादनात यंदा मोठी घट होणार आहे.आता सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे पावसाने गेल्या महिनाभरापासून उघडीप दिल्याने सोयाबीन करपू लागले आहे.

मनोहर पटाडे, सोयाबीन उत्पादक शेतकरी साळवाडी

जुन्नर तालुक्यात १३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली असून सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पिके करपू लागली आहेत.ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा पिक विमा काढला आहे. त्यांनी कंपनीला तात्काळ माहिती पाठवावी. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी पिकाला पाणी द्यावे त्यामुळे उत्पादन घट होण्याची शक्यता कमी आहे.

गणेश भोसले, जुन्नर तालुका कृषी अधिकारी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे