सह्याद्री व्हॅली येथे रंगला दहीहंडी सोहळा
1 min read
राजुरी दि.२९:- विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) येथे दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गोविंदा आला रे आला असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दहीहंडीत सहभागी झाले. अनेक बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन झाले. या कार्यक्रमाला सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भालेराव, मुख्याध्यापक सचिन डेरे, उपमुख्याध्यापिका रिजवाना शेख, विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी श्रीकृष्ण पूजन दत्तात्रय भालेराव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. भालेराव यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी केले.
या दहीहंडीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी फेर धरून नृत्य सादर केले. बालगोपाळांनी मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडताच सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य करत जल्लोष साजरा केला व दहीहंडीतील खाऊचा आनंद लुटला.या कार्यक्रमास पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पाडेकर यांनी केले व तृप्ती हाडवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.