कौतुकास्पद! जुन्नरची सुकन्या आशिया पॅसिफिक ट्रेल मध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

1 min read

बेल्हे दि.२८:- दक्षिण कोरिया मधील उल्जुगुन उल्सान सिटी या ठिकाणी २३ ते २७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या एशिया पॅसिफिक ट्रेलमध्ये गुळूंचवाडी (ता.जुन्नर) या लहानशा खेडेगावात राहून गवंडी काम करणाऱ्या शंकर सखाराम माळवदकर यांची कन्या ऋतुजा शंकर माळवदकर ही भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार असून ही गुळूंचवाडी गावासाठीच नव्हे. तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असुन गुळूंचवाडी गावचा डंका संपूर्ण जगभरात वाजणार आहे.ऋतुजा हिने देशभरातील अनेक मॅरेथॉन स्पर्धा मध्ये विजय संपादन केले असुन, अनेक वेळा वेगवेगळी पदके जिंकली असून सन २०२४ मध्ये लोणावळा येथे पार पडलेल्या. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ५० किलोमीटर धावण्याचे अंतर अवघ्या चार तास नऊ मिनिटात पूर्ण करुन ही स्पर्धा जिंकली आहे. ऋतुजाने आपले प्राथमिक शिक्षण गुळूंचवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण करुन माध्यमिक शिक्षण बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर महाविद्यालयात घेतले असुन, माध्यमिक शिक्षण घेत. असतानाच तिला धावण्याची आवड निर्माण झाली आणि तिने अनेक वेळा शालेय जीवनात धावण्याच्या विविध स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. ऋतुजाची एशिया पॅसिफिक ट्रेल मध्ये निवड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच गुळुंचवाडी गावाचे नाव संपूर्ण जगात झळकणार असल्यामुळे गावचे लोकनियुक्त सरपंच अतुल भांबेरे यांनी समाधान व्यक्त करताना ऋतुजाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन या स्पर्धेमध्ये यश संपादन करून संपूर्ण जगात भारत देशाचा ठसा उमटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया

‘जुन्नर तालुक्यातील गुळूंचवाडी गावची सुकन्या शंकर सखाराम माळवदकर यांची कन्या ऋतुजा शंकर माळवदकर ही भारत देशाचे प्रतिनिधित्व करणार असून ही गुळूंचवाडी गावासाठी आणि आपल्या जुन्नर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऋतुजाला या स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.’

अतुल बेनके, आमदार जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे