मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी भाव
1 min readमंचर दि.२३:- आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. २२) कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात झालेली असून चार दिवसांपूर्वीच्या बाजार भावामध्ये आणि गुरुवारच्या बाजार भावा मध्ये प्रति किलोमागे पाच रुपये वाढ झाली तर दहा किलोसाठी ४२१ ते ४७१ रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
मंचर बाजार समितीत गुरुवारी कांदा लिलाव पद्धतीने विकला गेला. दोन नंबर प्रतिचा कांदा ३६० ते ३८० रुपये दहा किलो, तसेच ३८० ते ४०० रुपये सुपर कांदे प्रति दहा किलो प्रमाणे आणि गोळे ४०० ते ४७१ रुपये प्रति दहा किलो प्रमाणे विकले गेले आहेत.
विशेष करून ४२१ रुपये ते ४७१ रुपये प्रति दहा किलो प्रमाणे खास काही कंपन्यांनी कांदा बी तयार करण्यासाठी कांदे घेतले आहेत. शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने निवड करून बदला कांदा, छोटी गोलटी, मोठा गोलटा, मध्यम कांदे आणि गोळा कांदा अशा पद्धतीने व्यवस्थित निवड करून आपला माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा.
असे मंचर येथील बीटी कंपनीचे संचालक आणि कांदा व्यापारी नितीन थोरात आणि गुरुकृपा ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत थोरात यांनी सांगितले. शेतकर्यांनी कांदा टप्प्याटप्प्याने बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन उपसभापती सचिन पानसरे, माजी संचालक बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, गोपालकृष्ण ट्रेडर्सचे वसंत थोरात यांनी केले आहे.