समर्थ ज्युनिअर कॉलेजची प्रांजल हुलवळे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
1 min read
जुन्नर दि.१९:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सन २०२४-२५ नुकत्याच जुन्नर येथे पार पडल्या. समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या विद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी प्रांजल शांताराम हुलवळे हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये १९ वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
क्रीडा संचालक एच पी नरसुडे बुद्धिबळ या खेळाविषयी माहिती देताना म्हणाले कि, अन्य खेळांच्या तुलनेत स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळणे, सराव करणे अधिक सोपे आहे. प्रत्येक खेळ हा आवडीने खेळला पाहिजे नव्हे नव्हे त्या खेळामध्ये आवड निर्माण केली तर यश नक्कीच तुमचे आहे.
जिद्द,चिकाटी,मेहनत व सातत्यपूर्ण सराव हाच यशाचा खरा गाभा असून त्याचे तंतोतंत पालन करून जीवनात उत्कर्ष साधावा. मैदानी खेळ आणि व्यायामाने शारीरिक क्षमता तर बुद्धिबळ सारख्या खेळाने मानसिक क्षमता उंचावते असे ते यावेळी म्हणाले.
या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. समर्थ शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांसाठी संकुलामध्ये योगा आणि मेडिटेशन हॉल बरोबरच अद्ययावत जिम सुविधा, ओपन जिम तसेच क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी खो-खो, बास्केटबॉल इत्यादी मैदानांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांवर अधिक भर देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तर विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतील असा आशावाद यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केला.
या विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे, कीर्ती थोरात, सुरेश काकडे, डॉ.ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर प्रांजल ची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
समर्थ ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी प्रांजल हुलवळे हिने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसुडे तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.