दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात क्रांतिवीरांना अभिवादन

1 min read

निमगाव सावा दि.९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (ता जुन्नर) येथे 9 ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन संदीपान पवार यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.अनिल पडवळ यांनी क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले. ते बोलताना म्हणाले की 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टॅंक येथे काँग्रेसचे महा अधिवेशन भरले. यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीनी “भारत छोडो” ची घोषणा दिली. ऑगस्ट क्रांतीला 1942 सुरुवात झाल्यानंतर महात्मा गांधी सह अनेक नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केली आणि चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला.

इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कला शाखेचे प्रमुख प्रा. सुभाष घोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी 9 ऑगस्ट हा क्रांती दिन का साजरा केला जातो तसेच स्वातंत्र्य लढ्याची मशाल पेटवत ठेवून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले.

सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणींच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या मनोगतात आदिवासी संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत मांडले. नवव्या शतकात आर्य लोक भारतात येऊन गंगेच्या सुपीक खोऱ्यात वर्चस्व मिळवून त्यांनी वसाहती केल्या.

त्या ठिकाणचा स्थानिक समाज दऱ्या खोऱ्यात, जंगलात विखुरला गेला व राहू लागला. कालांतराने पुढे त्यांना आदिवासी ओळखले जाऊ लागले. आजकाल अनेक लेखकांनी आदिवासी वर लेखन करून आदिवासी संस्कृती जोपासण्याचे तसेच आदिवासींच्या कथा आणि व्यथा सामाजिक करण्याचे कार्य केले.

आपल्याही आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याचे कार्य केले. 9 ऑगस्ट ची क्रांती खऱ्या अर्थाने जनतेचा उठाव होता. आजच्या युवकांनी या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे.असा संदेश दिला.

महाविद्यालयात १३ वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत आहे या माध्यमातून रासेयो स्वयंसेवकांनी अनेक जनहिताची, समाज उपयोगी, पर्यावरण पूरक कार्य केलेले आहे. यापुढेही आपल्याला हे कार्य अधिक जोमाने करावयाचे आहे.

त्यासाठी तुमच्यासारख्या युवक-युवतींनी राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंप्रेरणेने सामील होऊन आपल्या देशाच्या सेवेस, समाज कार्यास आणि प्रगतीस योगदान द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करुंन सर्वांनां क्रांतिदिन व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे, रा.से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. प्रवीण गोरडे, प्रा.आकाश धुमाळ, प्रा. नीलम गायकवाड, प्रा. पूनम पाटे महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते.                                 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदा आहेर , प्रास्ताविक प्रा. अनिल पडवळ आणि प्रा. माधुरी भोर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे