शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
1 min readअहिल्यानगर दि.६:- कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेचा पुरवठा करण्यात येणार आहे. फवारणी पंपाच्या लाभासाठी ६ ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारीत पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी राज्यशासनाकडून एकात्मिक कापूस आणि सोयाबीन इत्तर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालु खरीप हंगाम मध्ये १०० टक्के बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग पुरविण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना कापूस साठवणूक बॅग करीता अर्ज करता येतील. तसेच कृषी यांत्रिकिकरण या टाईल्स अंतर्गत शेतक-यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप करिता अर्ज करता येतील. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन ही बोराळे यांनी केले आहे.