२० गुंठ्यांत चिवचिव जातीच्या वांग्याचे १ लाख रुपयांचे उत्पन्न
1 min read
बोरी खुर्द दि.४:- बोरी खु (ता.जुन्नर) येथील प्रगतिशील महिला शेतकरी सुनिता बाबाजी बांगर यांनी स्वतःच्या शेतात वीस गुंठे क्षेत्रात चिवचिव जातीच्या वांगी पिकाची लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांना ५ ते ६ हजार इतका खर्च झाला असून पहिल्याच तोड्यात त्यांना २० हजार नफा मिळाला आहे. अजून किमान ५ महिने वांग्याची तोडणी करता येईल व त्यातून १ लाख रुपयां पेक्षा जास्त नफा भेटू शकतो असे बांगर यांनी सांगितले.
त्यांचे पती बाबाजी बांगर यांना पहिल्या पासून सेंद्रिय शेती ची आवड आहे. विषमुक्त भाजीपाला पिकवून समाजाला उत्तम प्रतीचा विषमुक्त भाजीपाला मिळावा, हा शुद्ध हेतू ठेऊन त्यांनी स्वतः आपल्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा बनवून आपल्या शेतात वापरत आहेत.
मे २०२४ महिन्यामध्ये बीट शेतामधून निघाल्यानंतर त्यांनी वांग्याच्या लागवड करण्याचे ठरवले.त्यासाठी त्यांनी शेतीची नांगरणी केली. त्यानंतर शेतात रोटर मारून सरी ओढल्या. वांग्याला ठिबक करून लागवड केली. दोन महिन्यापासून त्यांना शेताला पाणी देण्याची गरज पडली नाही. पावसाच्या जोरावरतीच ही वांगी चांगली तयार झाली.
यामधे जीवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, लसूण मिरची अर्क अशा विविध पद्धतींचा वापर करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करत आहेत. लिंबू, कापूर, दशपर्णी तेल असं घरगुती साहित्याच्या माध्यमातून फवारणी केली. तसेच त्या जोडीला विविध प्रकारचे कीटक सापळे वापरत आहेत चिकट सापळे, प्रकाश सापळे, फेरोमन सापळे अशा सर्व बाबीचा त्यांनी उत्तम वापर केला आहे.
त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन असे समीकरण करून त्यांनी नफ्याचे गणित साध्य केले आहे. जुन, जुलै महिन्यात पावसाचे सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे त्यांना उत्पन्नाच्या ३५ ते ४० टक्के वांगी खराब निघाली. त्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले. तरी त्यांना पहिल्या चार तोड्यामध्ये वीस हजार रुपयांचा नफा झाला.
वातावरण चांगले असते तर हा नफा डबल झाला असता असे बांगर यांनी सांगितले. यापुढे वातावरणाने साथ दिल्यास एक लाखापेक्षा जास्त नफा मिळणार असल्याचे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांना राजश्री नरवडे (कृषी अधिकारी बेल्हे), सूर्यकांत विरनक (विषय विषयतज्ञ आत्मा जुन्नर) यांनी मार्गदर्शन केले.