बेल्हे जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीतून विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे
1 min read
बेल्हे दि.३१:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर 1 (ता.जुन्नर) शाळेत विद्यार्थ्यांना शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीचे धडे देण्यात आले. यामध्ये शालेय बालसंसद उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या निवडणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातील एक प्रतिनिधी निवडून त्यामधून शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी विद्यार्थी उमेदवारांना चिन्ह वाटप करून काही दिवस प्रचाराला संधी देण्यात आली व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली.
शाळेतील 200 विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला व प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेत मतदान प्रक्रिया राबविली. यामुळे मुलांना खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष मतदान कसे होते व निवडणुकीतून प्रत्यक्ष उमेदवार कसे निवडले जातात याविषयी प्रत्यक्ष अनुभव आला. मुलांनी आनंद घेत या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला व आपल्या सर्वांच्या मनातील विद्यार्थ्याला शाळेचे मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले.शाळेमध्ये मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम आयोजित केले याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी शिक्षणा फाउंडेशन व त्याच्या मेंटॉर स्वाती शेलार यांचे आभार मानले.
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बांगर , उपाध्यक्ष सोईल बेपारी सर्व सदस्य,गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे,केंद्र प्रमुख सोपान बेलकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शाळेचे उपशिक्षक हरिदास घोडे, संतोष डुकरे, यांनी या प्रक्रियेचे नियोजन केले.तर कविता सहाणे,प्रवीना नाईकवाडी,सुवर्णा गाढवे,योगिता जाधव,सुषमा गाडेकर, अंजना चौरे इत्यादींनी यासाठी सहकार्य केले.