सोयाबीन पिकाला द्या ‘ही’ खते आणि मिळवा भरघोस उत्पादन
1 min read
पुणे दि.२८:- महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या जर आपण सोयाबीन पिकाची स्थिती पाहिली तर ती वाढीची अवस्था असून हा कालावधी सोयाबीन पिकासाठी खूप महत्त्वाचा आहे.
त्यामुळे सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून या कालावधीत विशेष काळजी घेणे व योग्य खतांचा पुरवठा सोयाबीन पिकाला करणे खूप गरजेचे असते. कारण सोयाबीन पिकामध्ये वाढीच्या अवस्थेपासून तर शेंगा पक्व होईपर्यंत अनेक प्रकारच्या पोषक अन्नद्रव्यांची गरज असते.
सोयाबीन पिकाला द्या ही खते आणि मिळवा भरघोस उत्पादन1- जेव्हा सोयाबीन पिकाचा वाढीचा सुरुवातीचा कालावधी असतो त्यामध्ये जमीन जर चुनखडीयुक्त असेल तर लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोयाबीन लागवडीनंतर जेव्हा त्याची उगवण व्हायला सुरुवात होते. त्यानंतर 18 ते 35 दिवसांपर्यंत जर चुनखडीनिर्मित लोहाची कमतरता असेल तर सोयाबीनची पाने पिवळी पडायला लागतात व शिरा हिरव्या दिसतात. अशा प्रकारची समस्या निर्माण झाली तर तुम्ही फेरस सल्फेट 50 ग्रॅम व त्यासोबत चुना 25 ग्रॅम प्रतिदहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
2- तसेच उगवणीनंतर 25 ते 30 दिवसा दरम्यान जर जमिनीत पाण्याचा तुटवडा किंवा कमतरता पडली तर अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे तसेच तणनाशक फवारणीनंतर सोयाबीनची वाढ काही प्रमाणामध्ये मंदावते किंवा खुंटते. ही समस्या जर तुम्हाला दिसून आली. तर उगवणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी पोटॅशियम नायट्रेट(13:00:45) या पाण्यात विद्राव्य खताची शंभर ते दीडशे ग्रॅम प्रतिदिन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.यामुळे सोयाबीनची वाढ जोरात होते व फुलांची निर्मिती देखील जास्त होऊन पाण्याचा ताण जरी पडला तरी तो सहन करण्याची शक्ती वाढते.
तसेच फुलधारणेच्या कालावधीमध्ये बोरॉनचा वापर करणे गरजेचे आहे.फुलनिर्मिती करिता बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य खूपच उपयुक्त असल्यामुळे पेरणीच्या वेळी जर ती जमिनीतून दिले नसेल तर या परिस्थितीत बोरॅक्स पावडर दहा ग्रॅम प्रथम गरम पाण्यात विरघळवून नंतर दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केली तर फायदा होतो.
3- तसेच सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्था ते शेंगा भरण्याचा कालावधीमध्ये प्रथिनांच्या निर्मिती करिता नत्र आवश्यक असते. जसे आपण वरती पाहिले की चुनखडी निर्मित जर लोहाची कमतरता तुम्हाला असेल तर सोयाबीन उगवणीनंतर.
साधारणपणे 55 दिवसांनी युरिया 100 ग्रॅम व त्यामध्ये फेरस सल्फेट 50 ग्रॅम अधिक चुना 25 ग्रॅम घेऊन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. परंतु लोहाची कमतरता नसेल तर मात्र सोयाबीन उगवणीनंतर 55 दिवसांनी फक्त दोनशे ग्राम युरिया प्रतिदहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
4- शेंगांमध्ये दाण्यांची निर्मिती आणि योग्य वेळी पीक परिपक्व होणे इत्यादीसाठी सोयाबीनच्या शेंगा भरण्यापासून ते त्या पक्व होईपर्यंत स्फूरदाची आवश्यकता असते.सोयाबीनची उगवण झाल्यानंतर स्फूरदाची फक्त मोनो- पोटॅशियम फॉस्फेट(00-52-34) किंवा 19:19:19 या पाण्यात विद्राव्य खताची शंभर ते दीडशे ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
या करिता पेरणीच्या वेळी शिफारशीत मात्रा दिल्या तर पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सोयाबीनला व्यवस्थित होऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये अन्नद्रव्य हळूहळू पिकाला व्यवस्थित पुरवले जाते. परंतु जर पेरणीच्या वेळी शिफारशीत खतांची मात्रा पिकाला दिली गेली नाही किंवा शिफारस केलेल्या प्रमाणात पेरणीच्या वेळी खतांचा पुरवठा झाला नाही.आताच्या घटकांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये अनेक समस्या निर्माण होऊन त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सोयाबीन पिकांसाठी अन्नद्रव्य वस्थापनाच्या दृष्टिकोनातून खतांचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते.