मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट, सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर:- जिल्हाधिकारी सुहास दिवसे
1 min read
पुणे दि.२५:- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार २५ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये जोरदार पाऊस होत असून, हवामान विभागाने पुढील काही तासांत पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २५ जुलै २०२४ रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
आदेशात म्हटले आहे की, डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,
सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्याना दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे.