साठवून ठेवलेल्या कांदा चाळीतून १०० गोणी कांदा चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल
1 min read
बेल्हे दि.२२:- साकोरी (माळवाडी) ता. जुन्नर येथील विक्रम अशोक साळवे यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळी मधून सुमारे साडेपाच टन कांदा चोरी गेला असून साळवे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की विक्रम अशोक साळवे (रा. साकोरी ता. जुन्नर) यांनी डिसेंबर २०२३ मध्ये ३ एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली होती. कांद्याला भाव नसल्यामुळे त्यांनी कांदा साठवून ठेवण्याचे ठरवले. त्यासाठी मनोहर पानसरे मु. साकोरी (पानसरे मळा) यांची कांदा चाळी भाड्याने घेऊन त्यामध्ये सुमारे ५५० गोणी कांदा साठवून ठेवला होता. रविवार दि.७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन ते तीन ठिकाणी ही कांदा चाळ फोडून सुमारे १०० गोणी कांदा चोरी केला.
यामध्ये १ लाख १० हजार रुपयांचं नुकसान झालं असल्याची फिर्याद विक्रम अशोक साळवे यांनी आळेफाटा पोलिसांनी दिली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अशा भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून कांद्याचे रोप चोरणे, कांदा चोरणे, सोयाबीन, चोरणे, टोमॅटो चोरणे असे प्रकार वाढल्यामुळे शेतकरी हवालदार झाला आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अशा चोऱ्यामुळे मोठा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.