पावसाने उघड दिल्याने बांगरवाडीच्या प्रतिपंढरपूरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

1 min read

बांगरवाडी दि.१७:- बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील प्रतिपंढरपुर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र गुप्त विठोबाचे मंदिर राज्यात प्रख्यात असून यंदा लाखो भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त दर्शनाचा लाभ घेतला. पावसाने उघडीप दिल्याने यंदा भाविकांची गर्दी वाढली. सुमारे दोन ते तीन तास रांगेत उभे राहून भाविकांनी विठुरायाचे दर्शन घातले.

देवाची आरती आणि महापूजा तालुक्याचे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, नवी मुंबई महानगरपालिका अभियंता गाडे व कोयना प्रकल्प अभियंता दरेकर या तिघांनी सपत्नीक पहाटे साडेपाच वाजता महापूजा केली. महापुजेनंतर महाआरती संपन्न झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी रांगा मोकळ्या करण्यात आल्या असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष नकाजीबुवा बांगर यांनी दिली.सकाळी आठ वाजेपासूनच प्रसादासाठी खिचडी आणि केळांचे वाटप मंडळाकडून करण्यात आले होते.सुमारे साडेतीन टन खिचडीचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरासाठी पुना ब्लड बँक सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले. पुणे व नगर जिल्ह्यातून तसेच आणे, गुळुंचवाडी, बेल्हे, साळवाडी, बांगरवाडी आणि आसपासच्या गावांमधून दिंड्यांचे आगमन झाले होते.दिंड्या आल्यानंतर दिंडी कोणताही अडथळा न येता गर्दीतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच हजारोंच्या संख्येने असणाऱ्या भाविकांच्या दर्शनाचे नियोजन मंडळाने व्यवस्थित रित्या केले होते. त्यामुळे आळेफाटा पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, शरद लेंडे, गुलाब पारखे तसेच बाळासाहेब दांगट, उद्योगपती भास्कर गाडगे, अनंतराव चौगुले यांसह लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे