जुन्नर तालुक्यातील ८७ नागरिकांना सर्पदंश; पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले
1 min read
जुन्नर दि.१२:- पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच प्रमाण वाढत चालेल आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने सापाच्या बिळामध्ये पाणी जाऊन साप बाहेर येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यत जुन्नर तालुक्यात ८७ नागरिकांना सर्पदंश झाला आहे.
असून सर्व उपचारानंतर ८६ बरे झाले आहेत तर येनेरे येथील एका नागरिकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला आहे. तालुक्यातील ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावांमधे सर्वाधिक २२ नागरिकांना सर्पदंश झाला.
तर आपटाळे १६, मढ ११, वारुळवाडी ८, इंगळून व पिंपळवंडी प्रत्येकी ६, येणेरे ५, बेल्हे व निमगाव सावा प्रत्येकी ४, आळे व राजुरी २, सावरगाव १ नागरिकांना सर्पदंश झाला.अशी माहिती जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी कुलमेथे यांनी दिली.
एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यत जुन्नर तालुक्यात १७५ जणांना सर्पदंश झाला होता. तर सर्व उपचारानंतर बरे झाले आहेत. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे अंतर्गत येणाऱ्या गावांतील सर्वाधिक ४६ लोकांना सर्पदंश झाला.
तर त्या खालोखाल ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील ४४ नागरिकांना सर्पदंश झाला तर निमगाव सावा व राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही नागरिकांना वर्षभरात सर्पदंश झाला नाही.
[सर्पदंश लक्षणे साप चावण्याची सामान्य लक्षणे आहेत, उल्टी होणे,चक्कर येणे,थंडी ,चिकट त्वचा. ]
सापाच्या जाती सापाच्या सोळा जाती विषारी असून त्यापैकी घोणस, नाग,मण्यार, फुरसे, पवळा, पट्टेरी पवळा, मलबारी, पापडा या प्रमुख जाती आहेत. बिनविषारी मध्ये २७ जाती असून.
धामण, तस्कर, गवत्या, खापर खवल्या, मांदूळ या काही प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये आढळणारे ५२ जातीच्या सापांपैकी ४२ साप बिनविषारी आहेत. या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप जे दिसायला काहिसे विषारी सापांसारखे असतात. असे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात. पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.
महाराष्ट्रामध्ये सर्पांच्या विविध जाती आढळतात. यातील नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार जाती विषारी आहेत. जुन्नर तालुका डोंगराळ असून उर्वरित प्रदेशात धरणांमुळे बागायती क्षेत्र वाढलेले आहे त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे.
सर्पदंश प्रामुख्याने शेतकरी आदिवासी कुटुंबातील शेतमजूर (20 ते 40 वयोगटातील) तरूणांना, महिला व मुलांना होतो. जनजागृतीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झाले असून स्थानिक पातळीवर अत्याधुनिक उपचार मिळाल्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान मिळत आहे.
अशी घ्यावी काळजी:- सर्पदंश सहसा रात्री होतो, म्हणून जून ते ऑक्टोबर दरम्यान जमिनीवर झोपणे टाळा, घराच्या व कुंपणाच्या भीतीचे तडे बुजवा, ड्रेनेज पाइपला बारीक जाळ्या बसवावे, घराजवळ पाचोळा , कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढीग, लाकडाचा साठा करु नये.
घराजवळ खिडकी दरवाजाना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घेणे घरजेचे, सरपण गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून उंचीवर ठेवा, चालताना पायात बूट असावे, शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका, जिथे काम करायचे तिथे आधी मातीचे लहान ढेकळे फेकून, तसेच काठी जमिनीवर आपटून काम सुरू करावे, अंधारात जाताना नेहमी हातात टॉर्च बाळगावी.
कुकडी नदी लगत गावांना घोणसचा विळखा तालुक्यातील पूर्व भागातील कुकडी नदी लगत असलेल्या गावांना घोणस जातीच्या सापांनी अक्षरशः विळखा घातलेला आहे. जुन्नर भागातून घोणस जातीचे सापांचे कुकडी लगत असलेल्या साकोरी, पारगाव, मंगरूळ, औरंगपूर, जाधववाडी, तांबेवाडी, निमगाव सावा, बोरी, शिरोली, सुल्तानपुर, साळवाडी आदी गावातील शेतात दर्शन होताना दिसत आहे.
घोणस जातीचा साप हा शक्यतो रात्रीचा भक्ष्याच्या शोधात बाहेर पडत असतो. शेतात, उजाड माळरानावर, रस्त्यावर ह्या सापाचे दर्शन होत असते. सध्या कांदा, गहू, ऊस आदी शेतातील पिकांना शेतकरी रात्रीचे पाणी देत असतात. अश्या शेतकऱ्यांनी सावध व सतर्कतेने काम करावे. असे आवाहन कुकडी लगत भागातील सर्पमित्र करत आहेत. सध्या बिळात पावसाचे पाणी जात असल्याने साप बाहेर पडतात. शेतकऱ्यांनी धोका ओळखून काळजी घेणे आवश्यक.
“साप घरात अथवा बाहेर असला तरी घाबरू नका, शांत राहा, सापाला न मारता आपल्या माहितीतील जाणकार सर्पमित्राला बोलवा . स्वतः साप पकडू नका. सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा, लहान मुले, पाळीव प्राणी , यांना सापा पासून दूर ठेवा. सापाजवळ जाण्याचा व फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याला पकडण्यासाठी टोपली, बादली, किंवा इतर कापड त्याच्या वर झाकू नये.”
आकाश माळी, सर्पमित्र
” सर्पदंश झाल्यावर प्रथम उपचार म्हणून रुंद क्रेप बॅडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे. बॅडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. त्यासाठी बॅडेज बांधताना फळीचा आधार द्यावा. दोरीने करकचून बांधू नये. त्यामुळे गॅग्रीन होण्याची शक्यता असते.रुग्णाला ताबडतोब डॉक्टरांकडे नेहावे.
वैद्यकीय तपासण्या व उपचार लक्षणांवरून कोणता साप चावला आहे हे ओळखता येते. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांना आपल्याला होत असलेला त्रास सांगणे गरजेचे आहे. भारतात नाग, मण्यार, घोणस आणि सुरसे या चारही विषारी सर्पदंशावर एकच लस उपलब्ध आहे.”
डॉ.सदानंद राऊत, सर्परोगतज्ञ नारायणगाव, ता.जुन्नर