कृषी विभागाचा दणका; अहिल्यानगर जिल्ह्यातील २० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
1 min read
अहिल्यानगर दि.११:- खरीप हंगामामुळे सध्या शेतकऱ्यांची बी-बियाण्यांच्या खरेदीसाठी लगबग सुरू आहे. खरीप हंगामात शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा वाजवी दरात मिळाव्या, यासाठी कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. दरम्यान खते, बियाणे काळा बाजार, खरेदी विक्रीचे दप्तर न ठेवणे यासह अन्य तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीअंती जिल्ह्यातील २० कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने कायमस्वरूपी, तर २२ परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून बियाण्यांचे ३५५, खतांचे ३५० आणि कीटक नाशकांचे ७८ नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. जिल्हास्तरावर १५ भरारी पथके कार्यरत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ९७ टक्क्यांपर्यंत खरीप हंगामाची पेरणी पोहचलेली आहे. बियाणे, खते, बिल, गुणवत्ता याबाबत तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत नेवासे, पाथर्डी, श्रीगोंदे, नगर आणि कर्जत तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर कारवाई केलेली आहे.