जुन्नर तालुक्यात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश…..अन्यथा होईल कारवाई

1 min read

जुन्नर दि.१०:- जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट तसेच धरणे व गडकिल्ले परिसर, शिवनेरी व माणिकडोह या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे आदी ठिकाणी वर्षाविहार, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी पर्यटनस्थळ परिसरात ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, भोर, वेल्हा या तालुक्यात देखील सदर आदेश लागू करण्यात आला आहे.या आदेशानुसार पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील, पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे. खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास प्रतिबंध राहील.

पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश, कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यासही प्रतिबंध राहील.या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लघंन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनिय अथवा कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे