मतदार नोंदणी विशेष मोहीम सुरू:- तहसीलदार रवींद्र सबनीस

जुन्नर दि.१: केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीपासून ते पत्ता बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यानुसार जुन्नर तालुका प्रशासनाने तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी मतदार नोंदणीसाठी उपाययोजनांची माहिती मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.
या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या २० जून रोजीच्या पत्रानुसार १ जुलै रोजी नोंदणीस पात्र असलेल्या मतदारांची २४ जुलैपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे.
याचबरोबर मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी सहा नंबरचा अर्ज, मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी आठ नंबरचा अर्ज भरून घेण्यात येणार असून, मतदार यादीत नाव दाखल करण्यात येणार आहे. २५ जून ते २४ जुलैपर्यंत मतदान केंद्र सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी २८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवडणूक नायब तहसीलदार सुधीर वाघमारे यांनी दिली.