रात्रभर बिबट्या बसला घरावर; कुटुंब रात्रभर जागे
1 min read
उंचखडक दि.३०:- बिबट्याची रात्रभर घरावर गुरगुर सुरू असल्याने उंच खडक येथील पाटीलबुआ कणसे यांच्या कुटुंबाला रात्र जागून काढावी लागली. शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या उंचखडक (ता. जुन्नर) येथील पाटीलबुवा तबाजी कणसे यांच्या घरावर रात्रभर ठिय्या मांडून राहिला. पाटीलबुवा कणसे यांच्या घरामध्ये मुलगा अनिल कणसे, सून सविता कणसे होते. त्यांना बिबट्या घरावर असल्याचा आवाज आला.
त्यानंतर पाटीलबुवा यांनी हातात काठी घेऊन घराच्या बाहेर येऊन पाहिले, तर काय घरावरं बिबट्या बसलेला होता.. त्यानंतर ते घाबरले व घरात जाऊन दरवाजा बंद करून बसले. त्यांना रात्रभर बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता.
त्यांच्या घराशेजारी बंधू सीताराम तबाजी कणसे यांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये शेळ्या व गाई बांधलेल्या होत्या. शिकार मिळेल या आशेने बिबट्या त्यांच्या घरावर बसून होता, परंतु गोठा बंदिस्त असल्यामुळे बिबट्याला शिकार मिळाली नाही. अखेर बिबट्या कंटाळून पहाटे ४ च्या सुमारास जवळच असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. त्यानंतर कणसे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.