व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये अवतरले विठोबा – रखुमाई
1 min read
नगदवाडी दि.६:- ‘विशाल जुन्नर सेवा मंडळ’ संचलित ‘व्हि.जे.इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी (ता.जुन्नर) च्या प्रांगणात ज्ञानोबा- माऊली’ च्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा’ संपन्न झाली. या दिंडीतील विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष विठोबा रखुमाई अवतरल्याचे चित्र दिसून आले.
या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी स्कूलचे विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते. इ.४थी मधील विद्यार्थी तन्मय डेरे व श्रेया गांधी या विद्यार्थ्यानी ‘विठ्ठल- रुक्मिणी’ची वेशभूषा परिधान केली होती. तर बरेचसे विद्यार्थी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, मुक्ताई बनले होते.
स्कूलच्या शिक्षका मनीषा हांडे व गौरी भोर यांनी ‘दिंडी सोहळ्याचे’स्वागत व प्रास्ताविक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी ‘विठ्ठल- रुक्मिणी’ प्रतिमेचे व पालखीचे पूजन केले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षक वृंद पुजनासाठी उपस्थित होते.
इ.६ वी व इ.७ वी मधील विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल’भक्तीपर भजन व नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी सफेद सलवार-कुर्ता, नऊवार साडी, झेंडे, तुळशीमाळा घेऊन पारंपारिक पद्धतीने रिंगण व फेर धरून विठु नामाच्या गजरात भजनही गायले व संपूर्ण वातावरण भक्तीमय केले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षका रोहिणी कोरडे यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला – क्रीडा व इतर सर्वच विभागातील शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.