देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केल्याने शिवसैनिक संतप्त
1 min readमंचर दि.१२:- शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा नागरि सत्कार आंबेगाव तालुक्याच्या वतीने मंचर येथे मंगळवार, दि. ११ रोजी रात्री होत असताना त्यांनी भाषणांमध्ये भावी आमदार देवदत्त निकम, असा उल्लेख करताच शिवसैनिकांनी थेट व्यासपीठावर चढून घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा दिल्यामुळे सत्कार समारंभात गोंधळ उडाला. महाविकास आघाडीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडून आल्याबद्दल मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार अमोल कोल्हे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार सुरू होता.
खासदार कोल्हे यांचा जाहीर नागरी सत्कार झाल्यानंतर त्यांनी भाषणामध्ये देवदत्त निकम असा उल्लेख केल्याने व्यासपीठावर आणि खाली असलेले शिवसैनिक यांनी घोषणाबाजी सुरू केली.
अजून महाविकास आघाडीचा फॉर्मुला भावी आमदार जाहीर न होताच खासदार अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख का केला? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसैनिक आणि व्यासपीठावरील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर,
समन्वयक राजाभाऊ बानखेले तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे, सुरेखा निघोट या शिवसैनिकांनी व्यासपीठाच्या बाजूला येत उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांनीही शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यासंदर्भात लवकर महाविकास आघाडीची जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये बैठक घेऊन जो गैरसमज झाला तो काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वस्थ केले.
यावेळी शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोल्हे आणि जगन्नाथ शेवाळे यांच्यासमोर घोषणा दिल्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तेथून बाहेर पडावे लागल.