बारामतीत सुळे समर्थकांनी केले हत्तीवरून लाडूंचे वाटप
1 min read
बारामती दि.७:- देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाला.
याच पार्श्वभूमीवर सुळे समर्थकांनी चक्क हत्तीवरून लाडूचे वाटप करून विजयी आनंद साजरा केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर कामगार व शेतकरी समर्थकांकडून चक्क हत्तीवरून हजारो लाडूचे बारामतीत वाटप करण्यात आले. हा विजयी सोहळा लक्षवेधी ठरला. बारामती लोकसभेची निवडणूक ही पवार कुटुंबातच झाल्याचे पाहायला मिळाली.
सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या दोघा नणंद आणि भावजईमध्ये सामना रंगला. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. सुनेत्रा पवार यांच्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण ताकद उभी केली होती.
तर सुप्रिया सुळे यांच्या बाजूने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यूहरचना आखली होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचारही करण्यात आला. मतदानानंतर कोण बाजी मारणार हे अखेरपर्यंत कोणालाही सांगता येत नव्हते. मात्र, चुरशीच्या लढतीत सुळे यांनी बाजी मारली.