शिरूरच्या ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये दाखल; त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त
1 min read
शिरूर दि.१५:- शिरुर मतदारसंघातील ईव्हीएम रांजणगाव एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर पुणे लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्र कोरेगाव पार्क धान्य गोदाम ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत.
मतमोजणी दि.४ जून २०२४ रोजी होणार आहे. त्यामुळे ईव्हीएम सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, त्या परिसरांना पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.
या दोन्ही ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक लीस असा तीनस्तरीय बंदोबस्त २४ तास तैनात आहे.
पुणे व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.१३) मतदान पार पडले. मतदान केंद्र ते विधानसभा मतदारसंघाचे मुख्य ठिकाण यामध्ये बरेच अंतर तसेच मतदानाची प्रक्रिया सायंकाळी सहा वाजता संपली असली,
तरी ईव्हीएम सील करणे, विविध अहवाल तयार करणे आदी कामकाजांसाठी वेळ लागतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अधिकारी-कर्मचारी ईव्हीएम पोलीस बंदोबस्तात घेऊन नेमून दिलेल्या बसेसनी विधानसभेच्या मुख्य ठिकाणी सोमवारी रात्री जमा केल्या.
त्यानंतर एकत्रित केलेल्या ईव्हीएम पोलीस बंदोबस्तात त्या- त्या लोकसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुमच्या ठिकाणी जमा करण्यात आल्या. ईव्हीएम वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती.
या दोन्ही मतदारसंघाच्या स्ट्राँग रूम निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखेखाली आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवारी सील करण्यात आल्या. येथे सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.