जुन्नर तालुक्यात अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर पोलिसांचा छापा; १७ तरुण व ११ तरुणींना ताब्यात
1 min read
जुन्नर दि.३१:- जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकला असून या कारवाईत रिसॉर्ट मॅनेजरसह १७ तरुण आणि ११ तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. ओतूर पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार दि.३० मे रोजी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह जुन्नर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यांच्या पथकास ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे या गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम चालू असल्याची माहिती मिळाली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी शाखेचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताठे,उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, विशाल भोरडे, मोसिन शेख, ओंकार शिंदे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, शुभांगी दरवडे यांच्या पथकाने केली.
सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह या रिसॉर्टवर छापा टाकून नाशिक जिल्ह्यातील एकूण 17 तरुण तसेच पुणे व इतर जिल्ह्यातील एकूण 11 मुलींना
तसेच रिसॉर्टच्या मॅनेजर यास ताब्यात घेऊन अश्लील नृत्याचा कार्यक्रम करत असले प्रकरणी ओतूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले प्रकरणी माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टचे मालक प्रदीप डहाळे (मुंबई) यांचे वरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी अधिक तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करीत आहेत.