आळ्यात बिबट्या पिंज-यात जेरबंद; २५ दिवसांत १० बिबटे जेरबंद
1 min read
आळेफाटा दि.३०:- आळे (ता.जुन्नर) येथील कैचन मळ्यातील शेतकरी सागर डावखर यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरूवार (दि.३०) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर बिबटयाला वन अधिकारी संतोष साळुंखे, त्रिंबक जगताप, बिबट कृती शीघ्र दलाचे वन कर्मचारी, ऋषिकेश गायकवाड, सोमनाथ भालेराव यांनी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
येथील मळ्यातील नागरीकांना बिबट्याचे दररोज दर्शन होत होते तसेच या ठिकाणी पाळीव प्राण्यांवर तसेच दुचाकीस्वारांवर बिबट्याने अनेक वेळा हल्ला केला होता त्यामुळे पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सदस्य मुकूंद भंडलकर, जयश्री डावखर यांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार कैचन मळ्यात आठ दिवसांपुर्वी पिंजरा लावण्यात आला होता व त्यामध्ये गुरूवारी सकाळी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला असुन या ठिकाणी अजुन दोन ते तीन बिबटे या ठिकाणी सकाळी फिरताणा दिसुन आले असल्याची माहीती विपुल यलमर, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, आप्पाजी डावखर यांनी सांगीतले.
आळेफाटा परीसरातील काळवाडी, पिंपळवंडी, उंब्रज, पिंपरी पेंढार या गावांमध्ये वन विभागाच्या वतीने बिबट्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंज-यांमध्ये गेल्या एक महिण्यात आजचा पकडलेला बिबट्या धरून दहा बिबटयांना जेरबंद करण्यात यश आल्याची माहीती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.