जुन्नर तालुक्यात वन्यप्राणी गणना; ओतूर वनपरिक्षेत्रात ११ ठिकाणी गणना
1 min readजुन्नर दि.२५ :- वनविभागाच्या वतीने गुरुवारी (दि.२३) बुद्ध पौर्णिमेनिमित्त तालुक्यात ११ पाणवठ्यावर सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत ओतूर वनपरिक्षेत्रांतर्गत वन्य प्राणी गणना करण्यात आली. वन्यप्राणी गणना करीत असताना वन कर्मचारी यांनी पानवठ्याशेजारी लपन करून मचान बांधली.
आणि ट्रॅप कॅमेरा लावून प्राणी व पक्षी यांची नोंद करण्यात आली. यामध्ये तृणभक्षी, मांसभक्षी प्राणी व पक्षी दिसून आले. प्राणी गणनेत मुख्यत्वे ससे, रानमांजर, ऊदमांजर, चिंकारा, नीलगाय, तरस, भेकड, रानडुक्कर, सांबर, वानर, साळींदर, मुंगूस, बिबट आदी वन्य प्राण्यांचा समावेश होता.
नर मोर, लांडोर, होला, किंगफिशर, कोयल, बुलबुल, रानबगळा, बारबेट, रॉबिन पक्षांचे अस्तित्व दिसून आले. उपलब्ध झालेली संपूर्ण माहिती वनविभागाच्या वरिष्ठांना कळविण्यात आली असून संरक्षण व संवर्धनाच्या उपाय योजना करण्यासाठी मदत होणार असल्याचे ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. काकडे यांनी नमूद केले.
जुन्नरला लाभलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे ओतूरचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. एम. काकडे यांनी सांगितले आहे.