रासायनिक खतांच्या किमतींत पुन्हा दरवाढ; बळीराजा अडचणीत

1 min read

पुणे दि.६:- खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे.

त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडत असल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. शिवाय बेसल डोस देणे आवश्यक असल्याने खताची आतापासूनच मागणी होत आहे. अशातच रासायनिक खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावातही मोठी वाढ झाली असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे.

सोयाबीन काढणीचे दरही प्रति एकर ५ हजार झाले आहेत तर इतरही खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असुन या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.

खतांचे पूर्वीचे दर व खतांचे सध्याचे दर:- 

१) 10.26.26 पूर्वी 1470 रुपये सध्या 1700 रुपये, २) 24.24.0 पूर्वी 1550 रुपये सध्या 1700 रुपये, ३) 20.20.0.13 पूर्वी 1250 रुपये सध्या 1450 रुपये, ४) सुपर फॉस्फेट 500 रुपये सध्या सुपर फॉस्फेट 600 रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खतांच्या वाढत्या किमतीचा परिणाम आपल्या देशात दिसून येतो. युरिया साधारणपणे १५ ते २० टक्के, पोटॅश १०० टक्के, सुपर फॉस्फेट ६० ते ७० टक्के बाहेरील देशातून आयात केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्याचा परिणाम देशात जाणवतो. अस जाणकार सांगतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे