भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला:- शरद पवार
1 min read
ओतूर, दि.१:- मोदी म्हणतात की, मी अस्वस्थ असतो. होय, मी लोकांचं दुःख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण मी लाचार होणार नाही आणि महाराष्ट्रही लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले.
हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींच्या टीकेची सव्याज परतफेड केली.
काही वर्षांपूर्वी शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणातून सांगितले होते. काल त्यांनी सांगितलं, राज्यात एक आत्मा अस्वस्थ आहे.
तो आत्मा गेली ४५ वर्षे महाराष्ट्र आणि इथल्या राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. आत्मा अस्वस्थ आहे हे खरंय, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईन, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी मोदींना दिले.