कोरठण खंडोबा विश्वस्त मंडळ नेमणूक आदेशाविरुद्ध हायकोर्टात अपील १४ जूनला सुनावणी!; विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी !
1 min read
बेल्हे दि.३०:- राज्यस्तरीय “ब” वर्ग तीर्थक्षेत्र आणि कुलदैवत श्री क्षेत्र कोरठन खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा (तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर) या देवस्थान वर १५ विश्वस्तांच्या नेमणुका अहमदनगरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त बी. व्ही दिवाकर यांनी दिनांक २३/०९/२०२२ चे आदेशाने केल्या आहेत. त्यानंतर न्यासाचे पदाधिकारी निवड करण्यात आले. त्यावेळी लोकप्रतिनिधीचे या विश्वस्तांच्या निवडीत वरचष्मा/वर्चस्व असल्याच्या ठळक बातम्या जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. सदर विश्वस्तांच्या निवड प्रक्रियेत आयुक्तांनी देवस्थानचे मानकरी मूळ मंदिराचे निर्माणकर्ते परिवारातील कोणालाही विश्वस्त निवड केले नाही.
राजकीय दबावाखाली विश्वस्तांच्या नेमणुका केल्या. सदरच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या दिनांक २३/०९/२०२२ च्या आदेशाविरुद्ध अर्जदार संकल्प विश्वासराव (बेल्हे), सुमन जगताप, योगेश पुंडे, राहुल पुंडे या ग्रामस्थ भाविक भक्तांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जुलै २०२३ मध्ये ॲड विनोद पाटील यांच्या मार्फत अपील याचिका क्र.(st) 24860/023 दाखल केली होती.
दिनांक २६/०४/२०२४ रोजी सदर याचिका न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठापुढे नमूद केली असता, सदर याचिकेवर १४ जून २०२४ रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निर्देशित केले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे श्री खंडोबा भक्तांचे लक्ष लागले आहे.
सदर याचिकेतील नमूद मुद्द्यानुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी देवस्थानच्या १५ विश्वस्तांच्या नेमणुका दिनांक २३/०९/२०२२ चे आदेशाने केल्या आहेत. सदरची निवड प्रक्रिया करताना आयुक्तांनी पारदर्शकता ठेवली नाही १४५ अर्जदारांच्या मुलाखती एकट्यानेच घेतल्या. कार्यालयातील कोणालाही सहाय्यक म्हणून मुलाखती घेताना मदतीला घेतले नाही.
नियमानुसार अर्जदारांची पात्रता, योग्यता, गुणवत्ता, गुणानुक क्रमांक, अनुभव, योगदान इत्यादी बाबत काही एक निकष विचारात घेतले नाहीत. आणि त्याबाबत दिनांक २३/०९/२०२२ चे आदेशातही काही एक नमूद केलेले नाही. राजकीय दबावाखाली विशिष्ट गटाच्या बाजूच्या अर्जदारांच्या विश्वस्त पदावर नेमणुका केल्या.
विश्वस्त पदांसाठी देवाचे मानकरी, विधी, न्याय सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, उद्योग इत्यादी क्षेत्रातील अनेक अर्जदारांनी मुलाखती दिल्या होत्या. परंतु त्यांचे पैकी कोणालाही विश्वस्त म्हणून निवड करण्यात आले नाही. न्यासाचे उद्देश पूर्तीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञ, नामांकित,अनुभवी व्यक्तींची विश्वस्त निवड करणे देवस्थानचे हिताचे झाले असते.
मुलाखत दिलेल्यांची गुणवत्ता यादी, गुणानुक्रमांक, यादी सदरच्या २३/०९/२०२२ चे आदेशात नमूद नाही. सदर सहाय्यक धर्मादाय आयुक्त बी व्ही दिवाकर यांचे नमूद प्रक्रियेतील कार्यपद्धती विरुद्ध याचिकाकर्ते व ग्रामस्थ यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये महाराष्ट्र शासन विधी व न्याय सचिव यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या होत्या.
सदर याचिकेत बी. व्ही दिवाकर (सहायक धर्मादाय आयुक्त), सचिव विधी व न्याय महाराष्ट्र शासन, देवस्थान ट्रस्ट इत्यादी प्रतिवादी आहेत. या याचिकेद्वारे देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करणे, विश्वस्त निवड प्रक्रिया पुन्हा नव्याने दुसऱ्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त मार्फत करणे.
अर्जदारांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त बी.व्ही दिवाकर नी यांचे कार्यपद्धतीबाबत शासनाकडे दिलेल्या लेखी तक्रारींची चौकशी करणे.अशा मागण्या न्यायालयाकडे करण्यात आले आहेत.अशी माहिती अर्जदार व याचिकाकर्ते संकल्प विश्वासराव यांनी दिली.