शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न ; शिष्यवृत्तीला नियोजन व आत्मविश्वास आवश्यक :- गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे
1 min read
बेल्हे दि.२१:- पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी व आठवी मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्व वर्गशिक्षकांनी वर्षभराचे उत्तम नियोजन, प्रश्नपत्रिकांचा अधिक सराव, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, व अधिकचा वेळ देवून आत्मविश्वासाने परीक्षेचे नियोजन केल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन जुन्नरच्या गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी केले.
सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी (ता.जुन्नर) येथे पाचवीला शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, तालुक्यात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती मंचाची स्थापन करून होतकरू शिक्षकांच्या सहकार्याने शिष्यवृत्तीचे संपूर्ण वर्षाचे नियोजन करून शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार असून अधिक सराव होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या सूचनेनुसार यावर्षी जिल्ह्यात शिष्यवृत्तीची तयारी लवकर सुरू करण्यात आली असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शिष्यवृत्ती मार्गदर्शक संजय रणदिवे, शैलेश गवळी, चंद्रकांत हगवणे, बनकर एम.आर, बेल्हेकर ची.आर, घंगाळे आर.आर यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी कॉलेजचे संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य पी. बलराम, शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला डुंबरे यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक विषयतज्ज्ञ सचिन गुंजाळ यांनी केले तर आभार संजय रणदिवे यांनी व्यक्त केले.