सोने व चांदी तेजीत, दोन महिन्यात सोने ११ तर चांदी १६ हजार रुपयांनी वाढले

1 min read

पुणे दि.२०:- जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सोने आणि चांदीचे दर वाढत असताना इस्रायलने इराणवर हल्ला केला असल्यासारखी परिस्थिती सकाळी निर्माण झाल्यानंतर जागतिक बाजारात पुन्हा सोन्याचे दर वाढून नव्या विक्रमी पातळीवर गेले.काल काही प्रमाणात नफेखोरी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले होते. तर चांदीचे दर स्थिर होते. मात्र, शुक्रवार दि.१९ सकाळी दिल्ली सराफात सोन्याचा दर चारशे रुपयांनी वाढून ७४,१०० रुपये प्रति दहा ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर चांदीचा दर दि.१९ रोजी शंभर रुपयांनी वाढून ८६,६०० रुपये प्रति किलो या नव्या उच्चांकी पातळीवर गेला.जागतिक बाजारात सोन्याचा दर २,३९९ हॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एकाच दिवसात जागतिक बाजारात सोन्याच्या दरात १५ डॉलरची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात चांदीचा दर २८.१९ प्रति औंस या पातळीवर गेला असल्यामुळे सर्वसामान्यांना आता सोने खरेदी करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.दोन महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची वाढ झाली. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. अशा स्थितीमुळे सोने खरेदी करावे की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे. चांदीच्या दरातही दोन महिन्यांत तब्बल १६ हजार रुपयांहून अधिक वाढ झालीय.सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करतात. मात्र, सध्या दिवसेंदिस सोने चांदी महाग होताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे कठीण झाले आहे. अनेक
लोक सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. दरम्यान, पुढच्या काही दिवसात अक्षय तृतीयाचा सण येणार आहे. यावेळी देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. त्यामुळे या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भविष्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. वाढत्या दराला आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत आहे. इराण आणि इसाईल युद्धामुळे जगात अनिश्चिततेचे वातावरण आहे. या स्थितीत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे