निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत चिल्लरखोर उमेदवारांना चाप
1 min read
अहिल्यानगर दि.१५:- निवडणुकीसाठी काही उमेदवार अर्ज दाखल करताना जाणीवपूर्वक चिल्लर घेऊन निवडणूक कक्षात येतात, अशावेळी अधिकाऱ्यांचाही इलाज नसल्याने ती रक्कम मोजत बसावी लागते. परंतु, अशा प्रकारांचा निवडणूक आयोगाने बंदोबस्त केला आहे.
नगर, शिर्डी लोकसभेसाठी येत्या १८ एप्रिलपासून अधिसूचना जारी होणार असून त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. लोकसभेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २५ हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला साडेबारा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते.
परंतु, काही उमेदवार शेवटच्या काळात अनामत रक्कम भरताना डाव साधू शकतात. चिल्लर रक्कम घेऊन डमी उमेदवार पाठवू शकतात. तेव्हा वेळ संपली तर एखाद्या उमेदवारावर निवडणुकीतून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते.
हेच लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने नियमात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरताना एक रुपयाचे एक हजार कॉइन स्वीकारले जाणार आहे. त्यापुढील रक्कम उमेदवारांना मोठ्या चलनात भरावी लागणार आहे.