मातोश्री कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न; आजचे विद्यार्थी उद्याचे भावी पिढीचे आधारस्तंभ :- राणी लंके
1 min read
कर्जुले हर्या दि.१०:- मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये बारावी सायन्स मध्ये विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा व करिअर या विषयी मार्गदर्शन केले.मातोश्री शैक्षणिक संकुल कर्जुले हार्य अंतर्गत मातोश्री सायन्स कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल आहेर व प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके व शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन रावसाहेब रोहोकले गुरुजी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व ईशस्तवन ने करण्यात आली. राणी लंके यांनी आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ आहे तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मुलींचे व महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे याबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे करिअर निवडावे असा सल्ला दिला.
तसेच रावसाहेब रोहोकले गुरुजी यांनी सुद्धा मुलांना भविष्यातील आव्हाने या विषयी माहिती करून दिली तसेच शिस्त संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी कोणकोणत्या उपाययोजना केला पाहिजे याचे अनमोल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका.
कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल तसेच स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची किंमत कधीही कमी करून घेऊ नका असे सांगितले.संचालिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना आवडेल त्या विषयात करिअर करा मात्र जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमांपासून दूर राहण्यास तसेच चांगल्या मित्रांची संगत धरण्यास सांगितले. बारावी नंतर असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे प्रत्येकालाच नोकरी मिळेल असे नाही शेती सारखा व्यवसाय जरी करायचा असल्यास तो उत्तम प्रकारे करा असे सांगितले.
प्राचार्य राहुल सासवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो आहोत, म्हणून अजिबात स्वतःला कमी समजू नका. उलट खरी घडण ग्रामीण भागातील मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळेतच होते आणि खरी गुणवत्ता आकारास येते. आयुष्यात सतत नवनवीन शिकत रहा.
आणि स्वतःच्या आत ज्ञान रूजवत रहा, मग तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही असे प्रतिपादन केले. तसेच आयुष्यात नुसते जगायचे नसते तर प्रत्येक कृतीतून शिकत रहायचे असते. ज्ञानाची भूक ज्याला असेल आणि कुठलीही गोष्ट अर्ध्यातून जो सोडत नसेल, त्याला यश मिळाल्याशिवाय राहात नाही. परिक्षेचा बाऊ न करता आत्मविश्वासाने सामोरे जावे.
बारावी सायन्स मधील विविध विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ निमित्त आपले मनोगत व्यक्त करून शिक्षक व कॉलेजप्रती ऋण व आत्मियता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अकरावी सायन्स मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते. सर्व कॉलेज मधील विद्यार्थ्याकरिता आणि पाहुण्याकरता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
बारावी सायन्स मधील विद्यार्थ्यांनी मातोश्री सायन्स कॉलेज करीता कलर प्रिंटर, समई, फोटो फ्रेम, राउटर, पाणी जार, अभ्यासक्रमाचे चार्ट, डस्टबिन, माईक, घड्याळ अश्या अनेक वस्तू सप्रेम भेट दिल्या.मागील वर्षी देखील साऊंड सिस्टिम व फोटो फ्रेम सप्रेम भेट देण्यात आलेली होती.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कॉलेज विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करत असते.
सदर कार्यक्रमासाठी राणी लंके, रावसाहेब रोहोकले गुरुजी, संस्थेचे सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दिपक आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, संचालिका डॉ.श्वेतांबरी आहेर, मातोश्री ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या शितल आहेर, रजिस्टार यशवंत फापाळे, प्राचार्य राहुल सासवडे.
प्राचार्य डॉ.कृपाल पवार, उपप्राचार्य डॉ. राहुल रहाणे, गणेश हांडे, राजेंद्र साठे, कविता भालेराव, गणेश कुठे, अजिंक्य बीडकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भविष्याचीतील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.