आषाढीसाठी पंढरीच्या वारीत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी ‘इतके’ हजार रुपये; शासन आदेश निघाला
1 min read
मुंबई दि.१५:- आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा शासन निर्णय (GR) देखील राज्य सरकारने जारी केला आहे.मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला
रु.20,000 इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निदेश दिले होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. दरम्यान पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी,
उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.आषाढी वारीचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे.
वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे.